मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झाले असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांनी भेटण्याचे कारण तसेच मंत्रिमंडळात न घेण्याबद्दलच्या कारणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. त्याचबरोबर भुजबळांना डावलण्याचा अजित पवारांचा हेतू नव्हता, असंही फडणवीस यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छगन भुजबळ मला भेटले आणि भेटल्यानंतर आमची काय चर्चा झाली, याबद्दल भुजबळांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. वेगळ्याने माहिती देण्याची काहीही आवश्यकता नाही. भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत. ते राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहे. पण, आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयात त्यांचादेखील वाटा राहिला आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मी स्वतः, अजितदादा देखील त्यांची चिंता करतात. मूळातच भुजबळ साहेबांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतलं. यावेळी भुजबळ साहेबांना डावलण्याचा त्यांचा अजिबात हेतू नव्हता. अजित पवारांनी मला सांगितलं, आमची इच्छा आहे की, आमचा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) हा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे. आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळसाहेबांसारखा नेता, ज्याला देशाच्या अन्य राज्यात देखील मान्यता आहे. त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचे आहे, असं फडणवीस म्हणाले.
भुजबळ साहेबांचे मत जराशे वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण, आम्ही सगळे मिळून यावर काहीतरी तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असलाच पाहिजे, यादृष्टीने त्यातून मार्ग काढला जाईल, असंही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.