पुणे : सगळीकडेच लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) लगबग सुरु आहे. आज बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेला शरद पवार यांच्यासह खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित राहणार आहेत. या सभेआधी संजय राऊत यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे, यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना सत्तधारी विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणं सुरु आहे, अशात संजय राऊत यांनी महायुतीवर मोठा आरोप केला आहे. महायुतीचे नेते लोकांना मतदान करण्यासाठी धमकावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यावेळी संजय राऊत पुढे म्हणाले, कोणी कितीही घोषणा करु द्या. तुमचा विजय होणार असल्याची इतकी खात्री असेल तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे कुणाला धमकावत आहेत. काल सोलापुरमध्ये उत्तम जानकरांच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. युतीचे काम करा किंवा तुरुंगात टाकू, मग तुम्हाला विजयाची इतकी खात्री आहे तर मग तुम्ही या धमक्या कशाला देता, तुम्ही काय बघून घेता? चार जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल”, असा इशारा संजय राऊत यांनी महायुतीला दिला.
तसेच, बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव केला हे देशाला दाखवायचं असेल तर ते शक्य नाही. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. आम्ही सगळे सुप्रिया सुळेंची भावंडं आहोत. बारामतीमध्ये तळ ठोका किंवा तंबु ठोका, काहीही होणार नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला आहे.