पुणे : पुण्यातील विधानपरिषदचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादबा वाघ यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. वार करून त्यांचा जीव गेल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून देण्यात आला होता. तर ज्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले त्यानंतर ते भीमा नदीत फेकून दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना तपासादरम्यान दिली आहे. त्याचा तपास करण्यात आला मात्र, ते धारदार शस्त्र अद्याप सापडलेलं नसल्याची माहिती समोर येत आहे.
सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात पत्नी मोहिनी वाघसह सहा आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मोहिनी वाघ व अतिश जाधव यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पवन श्यामसुंदर शर्मा (वय 30, रा. आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 31, रा. वाघोली, मूळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय 28, रा. वाघोली, मूळ रा. अहिल्यानगर), अक्षय ऊर्फ सोन्या हरिश जावळकर (वय 29, रा. फुरसुंगी फाटा), मोहिनी सतीश वाघ (वय 48, रा. फुरसुंगी) व अतिश संतोष जाधव (वय 20, रा. लोणीकंद, मूळ रा. धाराशी) अशी न्यायालयीन कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना काल (सोमवारी दि. 30) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयात सरकारी पक्षाकडून सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी युक्तिवाद केला. यावेळी वाघमारे यांनी न्यायालयाला सांगितले की, जाधव व गुरसाळे यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार पेरणे फाटा येथील भीमा नदीपात्रात टाकले असल्याचे सांगितले आहे. त्यासमक्ष गोताखोर टीमच्या साहाय्याने नदीपात्रामध्ये शोध घेण्यात आला आहे. मात्र, हत्यार अद्याप सापडून आले नाही. तपास करायचा असल्याचा युक्तिवाद वाघमारे यांनी केला आहे. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत सर्व आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.