नागपूर : २०१९ साली विविध संवर्गासाठी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला होता. या परीक्षेसाठी उमेदवारांनी मे. न्यासा कंपनीमार्फत अर्ज केले होते. मात्र, भरतीप्रक्रिया रद्द झाल्याने परीक्षा फीबाबत उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. या भरतीसाठी १३ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, गेल्या ४ वर्षांत विविध कारणांमुळे रद्द झालेल्या भरती प्रक्रियेची फी या उमेदवारांना परत मिळणार कधी, असा प्रश्न आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
आमदार तांबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले की, परीक्षांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना संबंधित जिल्हा परिषदेमार्फत परीक्षा फी परत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच यासाठी http://maharddzp.com या संकेतस्थळावर उमेदवारांनी शुल्क परताव्यासाठीची माहिती सादर करणे आवश्यक आहे. ८५ हजार ५५६ उमेदवारांना परीक्षेची फी परत मिळाली आहे. तर उर्वरित उमेदवारांना फी परत मिळण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशनात दिली.