पुणे : राज्यात सध्या कधी उन्हाचे चटके तर कधी हलका पाऊस असं संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.ढगाळ वातावरणामुळे दमटपणात वाढ झाली आहे. राज्यात काही ठिकाणी तापमानात किंचित घट झाली आहे. खान्देश आणि मराठवाड्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील मुख्य शहरांमधील हवामानाच्या स्थितीविषयी जाणून घेऊयात.
पुण्यातील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस राहील. पुण्यातील तापमानातही अंशतः घट झाली आहे. पुण्यात 20 मार्चला संध्याकाळनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह उपनगरामध्ये 20 मार्चला ढगाळ आकाश राहील. मुंबईतील किमान तापमान आज 23 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील. मुंबईतील तापमानात अंशतः घट झाली आहे. पण दोन दिवसांनी मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये 20 मार्चला आकाश ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूरमधील किमान तापमान 20 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस इतकं राहील. नागपूरमधील तापमानात अंशतः घट झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होऊ शकते.राज्यातील काही ठिकाणी तापमानात अंशतः घट झाली आहे.
हवामान विभागाने 20 मार्चला छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. ऊन- पावसाच्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.