पुणे : तुम्ही कमावती व्यक्ती असाल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरलेच पाहिजे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे.
करदात्यांच्या वेगवेगळ्या श्रेणी असतात, त्याप्रमाणे तुम्ही ज्या श्रेणीमध्ये असाल त्या श्रेणीतील रिटर्न भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा. कारण तुम्ही निर्धारित वेळेत तुमचे कर विवरणपत्र भरले नाही तर तुम्हाला मोठा दंड आकारला जाईल. काही वेळा करदात्यांना दिलासा देणारा निर्णय सरकार घेते. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख एक किंवा दोनदा वाढवण्याचा निर्णय सरकार घेते. ती बातमीही माध्यमांधून प्रसारीत केली जाते.
इन्कम टॅक्सशी संबंधित महत्त्वाच्या बाबीः-
१. पगारदार लोकांसाठी इन्कम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख दरवर्षी 31 जुलै आहे.
२. जर तुम्ही HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) श्रेणीचे करदाते असाल, तर तुमच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.
३. ज्यांना त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे असे वाटते, त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख ऑक्टोबर 2022 आहे. यामध्ये वैयक्तिक करदाते, भागीदारी संस्थांचे भागीदार, कंपन्या आणि इतर प्रकारच्या संस्थांचा समावेश होतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी या श्रेणीतील करदात्यांनी त्यांच्या खात्यांचे चार्टर्ड अकाउंटंटकडून ऑडिट करून घेणे आवश्यक आहे.
४. इन्कमम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 92E अंतर्गत, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहार करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या व्यवसायासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
तुम्ही वेळेवर इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही तर…
इन्कम टॅक्स रिटर्नच्या देय तारखेपर्यंत विवरणपत्र भरले नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दंड आणि व्याजासह उशिरा रिटर्न भरण्याची संधी मिळते. आर्थिक वर्ष 2017-18 पर्यंत, आयटीआर रिटर्न उशिरा भरल्याबद्दल कोणत्याही दंडाची तरतूद नव्हती, परंतु त्यानंतर वित्त मंत्रालयाने नियम बदलले आणि निर्धारित वेळेत रिटर्न न भरणाऱ्यांवर दंड आकारण्यास सुरुवात केली.
प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 139(4) नुसार शेवटच्या तारखेनंतर करदाते विलंब शुल्कासह त्यांचे विवरणपत्र दाखल करू शकतात. अशा परिस्थितीत, वैयक्तिक करदात्यांनी यावर्षी 31 जुलै 2022 नंतर त्यांचे विवरणपत्र भरल्यास त्यांना 5000 रुपये दंड भरावा लागेल. जर करदात्याचे उत्पन्न एका आर्थिक वर्षात 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला विलंब शुल्क म्हणून 1000 रुपये भरावे लागतील.
याशिवाय, करदात्यावर किंवा करदात्याचे कोणतेही कर दायित्व असेल, तर इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरल्यास, त्याला प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 234A अंतर्गत कर थकबाकीवर व्याज देखील भरावे लागेल. शेवटची तारीख संपल्यानंतर पहिल्या दिवसापासून रिटर्न भरण्याच्या दिवसापर्यंत ते मोजले जाईल. तथापि, जर करदात्याचे कोणतेही कर दायित्व नसेल तर तुम्हाला कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही.