पुणे : पुण्यात गेले काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर भागातून भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता पुण्यात अपहरणाची आणखी एक घटना समोर आली आहे. गुरुवारी पीडितेचं पुण्यातून अपहरण झाल्यानंतर मुंबईतून तिची सुटका करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील धनकवडी परिसरातून १६ वर्षीय तरुणीचं एकतर्फी प्रेमातून अपहरण करण्यात आलं होतं. गुरुवारी सायंकाळी रात्री सव्वा आठच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या आईसोबत रस्त्याने चालत जात होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणीसह तिच्या आईला अडवून एका आरोपीनं खिशातून बंदूकसदृश्य वस्तू काढत तरुणीच्या डोक्याला लावलं. आईला धमकी देत तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून तिचं अपहरण केलं.
मुलीचं अपहरण झाल्यानंतर पीडितेच्या आईनं तातडीनं घटनेची माहिती सहकारनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवल्यानंतर आरोपी पीडितेला घेऊन मुंबईच्या दिशेनं गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांचं एक पथक मुंबईच्या दिशेनं रवाना झालं. यानंतर आरोपी खालापूरवरून पुण्याच्या दिशेनं एका बसमधून येत असल्याचं पोलिसांना कळालं, त्यानुसार पोलीस खालापूरला जाऊन तरुणीची सुटका केली. पण आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.
याप्रकरणी पोलिसांकडून यश कातुर्डे नावाच्या तरुणासह त्याच्या मित्रावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातला एक आरोपी पीडितेच्या ओळखीचा असल्याची माहिती मिळत आहे. दोघातील एकजणाचं पीडितेवर एकतर्फी प्रेम होतं. यातूनच हे अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून सहकार नगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पण आईच्या डोळ्यादेखत तरुणीचं अशाप्रकारे अपहरण झाल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.