पुणे : नववर्षाच्या सुरवातीला राज्यात थंडीचा कडाका कमी झाल्याचं चित्र असलं तरी कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह राज्याच्या दिशेनं येत असल्यानं अनेक भागात सकाळी दाट धुक्याची चादर आणि हलका गारवा आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात चढउतार होताना दिसून येत आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता उत्तरेतील राज्यांमध्ये कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह आणि थंडीची लाट असल्याने राज्यात पुन्हा एकदा थंडीला पोषक स्थिती निर्माण होत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत असल्याने दक्षिणेत तुफान पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नव्या वर्षात हवामान नेमकं कसं असणार?
भारतीय हवामान विभागाकडून नव्या वर्षात उत्तर भारतात थंडीची लाट आणि दाट धुकं राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 2 जानेवारीपर्यंत पंजाब हरियाणा, झारखंड, हिमाचल प्रदेशासह जम्मू काश्मीरमध्ये तापमान 3 ते 5 अंशांनी घटणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर खोऱ्यात ‘चिल्लई कलान’ असल्याचं सांगितल्यानंतर काश्मीरचं तापमान उणे 8.5 अंश सेल्सियसवर पोहोचल्याची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात थंड रात्रीची नोंद तिथे झाली. हवामान विभागाच्या मते मध्य भारतात किमान तापमानाचा पारा येत्या आठवड्यात घसरणार असून 2-4 अंशांनी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अहवालानुसार, राज्यभरात येत्या पाच दिवसात तापमानात मोठे बदल होणार नसले तरी येत्या 3-4 दिवसात किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे. कमाल तापमान येत्या 24 तासांत 2-3 अंशांनी वाढणार असून हवामान कोरडं राहणार आहे. विदर्भात येत्या पाच दिवसात फारसा बदल होणार नसल्याचंही हवामान विभागानं वर्तवलंय. येत्या दोन दिवसात हळूहळू किमान तापमान घटणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.