सोलापूर : पावसाळ्यात एरवी राखाडी हिरवट बेडूक पाहायला मिळतात. मात्र, सोलापुरात पुना नाका मडकीवस्ती महामार्गाच्या कडेला चक्क पिवळ्या रंगाचा बेडूक पाहायला मिळाला.
नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिवराज ढाले पूना नाका महामार्गावरून मडकीवस्ती पार करून जात होते. तेव्हा त्यांना कडेला एक मोठा पिवळ्या रंगाचा बेडूक आढळून आला.
या बेडकाचा रंग इतर बेडकांपेक्षा वेगळा होता. तो जखमी असल्याचे त्यांना लक्षात आले. त्याला जास्त हालचाल करता येत नव्हती.
येणाऱ्या जाणाऱ्या गाडीखाली येऊन तो दगावण्याची शक्यता असल्याने ढाले यांनी सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना घटनेची माहिती दिली. राहुल शिंदे यांनी नॅचरल ब्लु कोब्रा संस्थेचे अध्यक्ष अनिल अलदार यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.
हा ‘बुल फ्रॉग’ जातीचा बेडूक असून साधारणतः एक महिना या बेडकाचा रंग पिवळा असतो आणि नंतर परत हा त्याच्या मूळ रंगात येतो. बेडूक हा सांडपाण्यावर बसणारे डास, डासांची अंडी आणि इतर कीटक खातो. एकप्रकारे तो रोगराईस आळा घालून माणसांवर उपकारच करतो. या बेडकावर सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी प्रथमोपचार करून त्याला त्वरित नैसर्गिक अधिवासात सोडले.
पावसाळ्याच्या सुरुवातीस निद्रावस्थेतून हे बेडूक जमिनी बाहेर पडतात. या काळात किड्यांची संख्या वाढते आणि बेडकांना मुबलक प्रमाणात अन्न प्राप्त होते. यामुळे पावसाळा हा बेडकांसाठी मिलनाला योग्य काळ असतो. मिलन काळात मादीला आकर्षित करण्यासाठी तो रंग पिवळा धारण करतो.