पुणे : छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलनानंतर स्वगृही परतलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आता सत्ताधारी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर मोठा दबाव आणला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दीपके यांनी दावा केला की, “मला भाजप पक्षाकडून अनेक ऑफर्स आल्या होत्या. परंतु मला जर भाजपमध्ये प्रवेश करायचा असता, तर मी याआधीच गेला असतो. मी पक्षात यावे यासाठी मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष धमक्या दिल्या गेल्या. आंदोलन मागे घे किंवा भाजपमध्ये सामील हो, अन्यथा तुला गोळ्या घालून संपवू, अशा भाषेत धमकावण्यात आले असा आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबालाही या वादात ओढले जात असल्याचा संताप व्यक्त केला. “केवळ मलाच नाही, तर माझ्या आई-वडिलांनाही घर गाठून धडा शिकवण्याची भाषा वापरली जात आहे. माझे वय अवघे 30 वर्षे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचा मी तरुण आहे. आपल्या नातवाच्या वयाच्या तरुणाला धमकावताना आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास देताना यांना काहीच वाटत नाही का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपचीच राजकीय भाषा असल्याचा घणाघाती आरोप करत दीपके म्हणाले की, जे समोरच्याला आपलेसे करू शकत नाहीत, त्यांना संपवण्याचा प्रयत्न करणे हेच त्यांचे धोरण आहे. दीपके यांच्या या जाहीर वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.








