पुणे : राज्यातील तापमानामध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप मोठे बदल बघायला मिळत आहे. काही ठिकाणी कडाक्याची थंडी तर काही ठिकाणी पाऊस अशी राज्यातील सद्याची स्थिती आहे. अशामध्ये राज्यात पुढचे ४८ तास खूपच महत्वाचे असणार आहेत. हवामान खात्याने महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला असून यलो अल्रट जारी केला आहे.
या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट..
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खान्देश, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमधील अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसणार आहे. हवामानातील बदलामुळे आणि पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशामध्ये शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाचे अपडेट्स घ्यावे आणि आवश्याकतेनुसार शेतीशी संबंधित कामं करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 26 डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या पावसासह ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 27 रोजी खान्देश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच दुसऱ्या दिवशी, २८ डिसेंबर, खान्देश, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, या भागातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अपडेट्सकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार त्यांच्या शेती पद्धती समायोजित कराव्यात.