मुबंई : उद्या 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ कडून आंदोलनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात SIR (एसआयआर) प्रक्रियेच्या मुद्द्यावरून सीजेपीने हे एल्गार आंदोलन पुकारले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 4 वाजता हे जेलभरो आंदोलन होणार आहे.

मुंबई पोलिसांच्या वतीने या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी देण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी संपूर्ण मैदानाभोवती बॅरिकेड्स लावून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तरीसुद्धा, सीजेपीचे कार्यकर्ते आणि अभिजित दीपके हे शिवाजी पार्क येथेच आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

या आंदोलनाला केवळ पोलिसांचाच नाही, तर स्थानिक नागरिकांचाही तीव्र विरोध पाहायला मिळत आहे. सीजेपी कार्यकर्त्यांनी मैदानाची पाहणी केली असता, स्थानिक रहिवासी आणि आंदोलकांमध्ये दोन वेळा जोरदार बाचाबाची झाली. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतरही सीजेपीने आंदोलनाचा मार्ग बदलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.इथंच आंदोलन करणार असल्याचा निर्धार
सीजेपीने धरला आहे.

देशभरातील तरुणांनी या आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी अभिजित दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर “चला मुंबईला जाऊया” असे आवाहन केले आहे. पोलिसांचा विरोध, स्थानिक नागरिकांची नाराजी आणि सीजेपीचा ठाम निर्धार यामुळे उद्या 2 ऑक्टोबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मोठा तणाव आणि पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.







