लोणी काळभोर, ता. 1 : जागा आपल्या नावावर करून देण्याच्या मागणीवरून झालेल्या वादात नातवाने 77 वर्षीय आजोबांना शिवीगाळ करून लोखंडी रॉड व बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) परिसरात 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आजोबांनी आपला नातू आणि सुनेविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तेजस आशिष भापकर (वय 23 ) आणि मंगल आशिष भापकर (वय 45) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वामन गेणबा भापकर यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वामन भापकर हे थेऊर येथील चिंतामणी गणपती मंदिराजवळ राहतात. भापकर यांचा नातू तेजस हा सध्या दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे मामाकडे राहतो. त्यांच्यात किरकोळ कारणांवरून यापूर्वीही शाब्दिक वाद झाला होता.

तेजस हा दारूच्या नशेत 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घरी आला. त्याने आजोबांना शिवीगाळ करून, “माझ्या नावावर पूर्ण जागा कर, नाहीतर तुला जीवे मारून टाकतो,” अशी धमकी दिली. यानंतर त्याने घराजवळ ठेवलेल्या बांबूच्या लाकडाचा धाक दाखवत आजोबांना लोखंडी रॉड आणि बांबूच्या काठीने मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी घरातील खुर्ची, टेबल, गॅस शेगडी आदी वस्तूंचेही नुकसान केले.

मारहाण सुरू असताना तक्रारदारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेजसने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेतला, तसेच डाव्या हातावर लोखंडी रॉडने मारल्याने जखम होऊन रक्तस्राव झाला. दरम्यान, तेजसची आई मंगल भापकर हिनेही शिवीगाळ करून हाताने व बुक्क्यांनी मारहाण केली आहे.जखमी झाल्यानंतर वामन भापकर हे उपचारासाठी ससून रुग्णालयात गेले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.






