पुणे : पिंपरी चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. ऐन उन्हाळ्यात अनियमित, अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मागील ४० दिवसांमध्ये शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 1 हजार ९२ तक्रारी महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
शहराची लाेकसंख्या झपाट्याने वाढत असून पाण्याची मागणीही सातत्याने वाढू लागली आहे.उन्हाळा सुरू हाेताच शहरातील कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टॅंकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे नागरिक पाण्याच्या टंचाईने हैराण झाले आहेत. शहरातील गृहनिर्माण साेसाट्यांना टॅंकरचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८०, तर एमआयडीसीकडून २० असा ६२० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जाताे. त्यानंतरही औद्याेगिकनगरीतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. आता वाढत्या लोकसंख्येनुसार पाणी कोटा वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे. शहरात दिवसेंदिवस पाणी प्रश्न निर्माण होत चालला असून गेल्या 40 दिवसांमध्ये 1092 तक्रारी नागरिकांनी महापालिकेच्या हेल्पलाइन नंबरवर सांगितल्या आहेत..यामधील ५४३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, ५४९ तक्रारी प्रलंबित आहेत.
दरम्यान महापालिकेच्या प्रत्येक जनसंवाद सभेत पाण्याच्या तक्रारी वाढत आहे. १ फेब्रुवारी ते १२ मार्च या ४० दिवसांच्या कालावधीमध्ये महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या एक हजार ९२ तक्रारी आल्या आहेत. ‘ड’ प्रभागातून सर्वाधिक २११, तर सर्वांत कमी ‘ह’ प्रभागातून ४५ तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासन सतर्क होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.