भोर : हिरडस मावळ खोऱ्यातील नीरा- देवघर (ता. भोर) धरणातून उजव्या कालव्याला १५० क्यूसेक्सने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बीचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. आवर्तनामुळे पूर्वेकडील भोर, खंडाळा, फलटण येथील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांसाठी फायदा होणार आहे.
सध्या तालुक्यात रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा तसेच इतर पिके जोमात आली असून पिकांना पाण्याची गरज आहे.निरा-देवघर धरण प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पहिले आवर्तन सुरू केले असून कालव्यातून पाणी पूर्वेकडील भागात सुरू आहे. पाणी पुढील दहा दिवस सुरू राहणार असून या पाण्यामुळे शेतकरी पिकांची रात्रंदिवस भिजवणी करत असल्याचे चित्र आहे.
कालव्याला वेळेवर पाणी सोडल्याने परिसरातील गाव-वाडीवस्त्यावरील नागरिकांचा शेतीचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. लाभ क्षेत्रातील गावांना या कालव्याच्या पाण्याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी कालव्यातील पाण्याचा उपयोग काटकसरिने करावा असे प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे