राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील खामगाव येथील गाडामोडी – पिंपळगाव रस्तावरील तांबेवाडी रस्त्याच्या दुरूस्ती अभावी रस्त्यांची अक्षरशा दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषद शाळेसमोर वारंवार पाण्याचे तळे साठत असल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. खड्डे, चिखल आणि त्यात साचलेले पाणी यामुळे वाहन चालक व नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.
पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर परिसरातील नागरिकांनी नाराजी केली आहे. यवत स्टेशन, उंडवडी, लडकतवाडी येथील अनेक विद्यार्थी या रस्त्यावरून पाण्यातुन कसरत करत शाळेत जात आहेत तर जवळच जिल्हा परिषद शाळा असल्याने साठवेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत आहे. जवळून मोठे वाहन गेल्यास मुलांच्या अंगावर घाण पाणी उडत आहे.
शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, वाहनचालक, प्रवाशी यांची मोठी गैरसोय होत आहे. अशी दयनीय परिस्थिती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन -प्रशान व लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.