Water Issue : छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जलाशयांमध्येयंदा अवघा 66.31 टक्के आहे. गतवर्षी तो 87.10 टक्के होता. म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा 21 टक्के कमी आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याला तीव्र पाणी टंचाई सोसावी लागणार आहे. यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पावसाअभावी खरीप हातातून निधून गेला.
छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा)विभागात सर्वाधिक कमी 37.63 टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागात 71.78 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 79.49 टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागात 75.62 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 91.52 टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागात 70.39 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 88.08 पाणीसाठा होता. नाशिक विभागात 70.61 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी 89.89 टक्के पाणीसाठा होता.
राज्यात 383 टँकरने पाणीपुरवठा…
राज्यात 363 गावं आणि 957 वाड्यांवर 383 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात नाशिक विभागातील 155 गावं आणि 286 वाड्यांवर129 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 18 शासकीय आणि 111 खाजगी टँकर्सचा समावेश आहे. पुणे विभागात 115 गावं आणि 649 वाड्यांवर 113 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 25 शासकीय आणि 88 खाजगी टँकर्सचा समावेश आहे. मराठवाडा विभागात 96 गावं आणि 22 वाड्यांवर 141 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 5 शासकीय आणि 136 खाजगी टँकर्सचा समावेश आहे.
जालना जिल्ह्यातील 350 गावात सार्वजनिक ठिकाणी पाणी उपसा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसतांना पाहायाला मिळत आहे. कारण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील बहुतांश भागात पाणी टंचाई जाणवायला सुरवात झाली आहे. काही भागात तर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात प्रशासनाने आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे.