मुंबई : मुंबईमध्ये उन्हाच्या झळा अद्याप तीव्र झाल्या नसल्या तरीही नागरिकांना उन्हाळ्याचा दाह सोसावा लागत आहे. कारण, शहरात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणीकपात लागू करण्यात आली आहे. उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईतच सरसकट 15 टक्के पाणी कपात लागू करावी लागणार आहे. या उदंचन केंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर पूर्ण जळाल्यामुळे काही पंप बंद ठेवावे लागणारे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे दुरुस्त होण्यास साधारण 5 मार्चपर्यंतचा वेळ लागू शकतो. परिणामी 5 मार्चपर्यंत शहरात 15 टक्के पाणी कपात लागू असेल. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाची नागरिकांनी नोंद घेत योग्य पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणकोणत्या भागात लागू असेल पाणीकपात?
दरम्यान, सध्या संपूर्ण मुंबई शहरासह पश्चिम उपनगरं, पूर्व उपनगरं आणि ठाणे शहर, भिवंडी, नगर बाह्य विभागांना मुंबई 2 आणि 3 या जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात आलीय. विशेष म्हणजे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे संपूर्ण मुंबईत दहा टक्के पाणी कपात करण्याबाबत पालिका प्रशासन विचार करत आहे.