अकोला : प्राथमिक चौकशीचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी 9 लाखांची लाच मागून 6 लाख रुपये लाच स्वीकारताना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.6) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अकोला एसीबीच्या पथकाने सापळा रचून वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथे केली .
जिल्हा उपनिबंधक वर्ग -1 सहकारी संस्था वाशिम दिग्विजय हेमनाथ राठोड (वय-54 रा. साई विहार रेसिडेन्सी पाषाण सुस रोड, पुणे, सध्या रा. सिल्वर अपार्टमेंट तिरुपती सिटी, वाशिम) असे लाच स्वीकारताना पकडलेल्या क्लास वन अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मंगरुळपीर येथे राहणाऱ्या 46 वर्षीय व्यक्तीने अकोला एसीबीकडे तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे विरुद्ध सुरु असलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी राठोड यांनी 9 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील 2 लाख 50 हजार रुपये अगोदरच दिले होते. उर्वरित राहिलेल्या पैशासाठी राठोड याने तगादा लावला होता. याबाबत तक्रारदार यांनी 4 जून रोजी अकोला येथील अँन्टी करप्शन ब्युरो येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी 6 जून रोजी पडताळणी केली. यावेळी आरोपी राठोड यांनी तडजोडीअंती तक्रारदार यांना 6 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन सापळा रचून राठोड याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. एसीबीने त्यांना ताब्यात घेऊन वाशिम शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.