छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगर भागात घडलेल्या चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणाला आता गंभीर कौटुंबिक वादाचे वळण मिळाले आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता मृत संगीता चांदगुडे यांची बहीण आणि कुणालची मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी समोर येत सासूच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मावशी पल्लवी यांनी जुन्या घटनांचा उल्लेख करत थेट प्रश्न उपस्थित केला की, 20 वर्षांपूर्वी मुलाने घर आणि शेत सोडावे म्हणून त्याच्या डोक्यात फावड्याने वार का करण्यात आला होता? त्या वेळी मुलाच्या जीवाचा विचार का केला गेला नाही, असा परखड सवाल त्यांनी विचारला. तसेच, सध्या कुटुंब मोठ्या दुःखात असून या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी सर्वांनी थोडा वेळ द्यावा, अशी नम्र विनंतीही त्यांनी केली.

मृत मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने त्यांच्या मूळ गावी (अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगाव) गंभीर दावे केले होते. आपल्या सुनेने (संगीता) मुलाला तब्बल 20 वर्षांपासून कुटुंबापासून दूर ठेवले, असा आरोप त्यांनी केला. मुरलीधर फारसा कोणाशी बोलत नसत आणि त्यांची पत्नी संगीता त्यांना नातेवाईकांशी संवाद साधू देत नव्हती, असा दावाही सासूने केला होता.

या प्रकरणाच्या तपासाची दिशा सुरुवातीला या घटनेमागे आयफोनचा हट्ट किंवा इतर कारणे असल्याची चर्चा होती. मात्र, दोन्ही बाजूंचे नातेवाईक आमनेसामने आल्याने आणि परस्परविरोधी खुलासे करत असल्याने या प्रकरणात कौटुंबिक कलहाची पार्श्वभूमी उघड झाली आहे. त्यामुळे वाळूज एमआयडीसी पोलीस आता या सर्व कौटुंबिक वादांच्या अंगाने सखोल तपास करत आहेत.







