नाशिक : महाराष्ट्र कर्नाटक यांच्यात सिमाप्रश्नावरून वादंग उठला असताना आता नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील ५५ गावांनी देखील गुजरातमध्ये सामील होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य शासनासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही सर्व गावे आदिवासी ग्रामस्थांची असून आज या गावांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेजवळ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका आहे. या भागातील अनेक गावांमध्ये अजूनही आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. या भागात राज्य सरकार कोणत्याही प्रकारच्या सोइ सुविधा पुरवत नसल्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत असून या आरोपामुळेच त्यांनी गुजरातमध्ये सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पांगारगण या गावात ग्रामस्थांची बैठक घेण्यात येणार आहे. या भागातील आदिवासी बांधव सर्व सोईसुविधांपासून वंचित असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे समोर येत आहे.
त्यामुळेच सीमावर्ती भागातील आदिवासी बांधवानी आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी नवीन क्लुप्ती शोधली असण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण होऊन किमान विकासकामांना सुरुवात होऊ शकेल.