लातूर : लातूरच्या औसा तालुक्यातील बुधोडा गावातील 25 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाकडून नोटिसा मिळाल्या आहेत. गावातील जवळपास 175 एकर जमिनीवर दावा सांगण्यात आला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या समशाद अझगर हुसैन यांनी वक्फ न्यायधिकरणाकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीवरुन वक्फ न्यायधिकरणाने बुधोडा गावातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील तळेगाव नंतर हा दुसरा धक्कादायक प्रकार समोर आला. शेतकऱ्यांच्या जवळपास 175 एकर जमिनीवर दावा करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वक्फकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यात प्रामुख्याने लातूर जिल्ह्यातील तळेगाव या गावातील प्रकार उघडकीस आला आणि आता बुधोड गावातील शेतकऱ्यांना नोटीस दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लातूर जिल्ह्यातील तळेगाव इथल्या 300 एकर जमिनीवर वक्फने दावा केला आहे. वक्फची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते. त्यातून वक्फ ट्रिब्यूनलकडे आलेल्या तक्रारीवरुन लातूरमधील 103 शेतक-यांना नोटीस पाठवण्यात आली. या जमीन वादात सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतक-यांनी केली होती. त्यानंतर आता बुधोडमध्येही हाच प्रकार घडला आहे.