पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि एका कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपास करत आहे. यादरम्यान खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड याला रविवारी रात्रीच पुण्यातून सीआयडीने अटक केल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. अद्याप वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाही, असे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कराड याला अटक केल्याचे वृत्त निराधार असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान वाल्मिक कराड याची चारही बाजूंनी कोंडी झाल्यामुळे तो आता पोलिसांसमोर शरणागती पत्कारणार असल्याची चर्चा आहे. वाल्मिक कराड हा सोमवारी संध्याकाळपर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत बीड पोलीस अथवा सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर शरण जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता कराड हा पोलिसांनी केव्हा आणि कुठे शरण जाणार, त्याच्या चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर येणार, याकडे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.