वाघोली : येथील गांजा (Ganja) विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. मात्र अटकेची कारवाई केल्यानंतर महिला पोलिस कामात व्यस्त असताना नजर चुकवून आरोपी महिलेने तिथून धूम ठोकली. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात (Lonikand Police Station) पुन्हा तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली (Wagholi) येथील गायरान वस्ती येथे होत असलेल्या गांजा विक्रीबाबत माहिती मिळाल्यानंतर 25 एप्रिल रोजी रात्री उशिरा लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून एक किलो 329 ग्रॅम गांजा जप्त करुन छकुली राहुल सुकळे (वय-24,रा. वाघोली) या महिलेवर गुन्हा दाखल केला होता.
त्यावेळी रात्रीची वेळ असल्याने महिलेला अटक न करता तिला नोटीस देण्यात आली. २६ एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास महिलेस अटक करून अटकेबाबत नोंद घेण्यात आली. तिला महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे ताब्यात देण्यात आले. दुपारी १२ च्या सुमारास त्या महिला पोलीस कर्मचारी सीसीटीएनएस कक्षामध्ये काम करीत असताना छकुली सुकळे ही नजर चुकवून तिथून पसार झाली.
यावेळी पोलिस नाईक जगताप व तळेकर यांनी पोलिस स्टेशनच्या आवारात आणि परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता ती महिला सापडलीच नाही. यानंतर 30 एप्रिल रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महिला छकुली सुकळे हिच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात भादवि कलम 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.