पंढरपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून महायुतीने 230 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला असून महाविकास आघाडीला मात्र मात्र 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. अशातच अनेक पराभूत उमेदवारांना आपला पराभव पचवता आलेला नाही, त्यामुळे काहींनी फेरमोजणीची मागणी केलेली दिसून येत आहे. अशातच मनसे उमेदवाराने एक अजबच दावा केला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप काशिनाथ धोत्रे यांनी ‘मतदारांनी शपथ घेवुन सांगितले तुम्हालाच मतदान केले, मग मतदान कमी कसे झाले? असा अजब दावा करत व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करावी, अशी मागणी करत विनंती अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केला असून हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
दिलीप काशिनाथ धोत्रे यांनी म्हटले आहे की मतदार संघातील मतदारांनी मला शपथ घेवुन सांगितले आहे की आम्ही आपणास मतदान केले आहे. असे असताना देखील मला मतदान कमी कसे झाले? अशी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी करावी असा विनंती अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केला होता. परंतु विजयी उमेदवार आणि अर्जदार उमेदवार यांच्या दरम्यान मतांची तफावत लक्षणीय अधिक आहे. ज्याअर्थी 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदानाची ईव्हिएम मतदान यंत्राद्वारे मोजणी करण्यात आली असून त्यात चुका संभवत नाहीत. मतमोजणीमध्ये कोणताही दोष अथवा ठोस कारण निदर्शनास आणले गेले नाही. असे सांगत निवडणुक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिलीप धोत्रे यांची मागणी अमान्य केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चौरंगी लढत बघायला मिळाली असली तरी खरी लढत समाधान आवताडे व भगीरथ भालके यांच्यामध्येच झाली आहे. या लढतीत भाजपचे समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. तर दिलीप काशिनाथ धोत्रे चौथ्या स्थानावर राहिले आहेत.