राजेंद्र गुंड-पाटील
माढा- सोलापूर जिल्हा परिषदेकडे आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेसाठी प्रस्तावित केलेल्या माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी,वडाचीवाडी (अं.उ), शिंगेवाडी व सोलंकरवाडी या चारही गावांनी केलेली कामे उत्कृष्ट व समाधानकारक असून ती उद्देशपूर्ती करणारी आहेत. यापुढेही या गावांनी असेच विधायक उपक्रम व समाजोपयोगी योजना राबवाव्यात आणि शासनाच्या निकषांनुसार कामे करावीत. असे प्रतिपादन माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांनी केले आहे.
विठ्ठलवाडी (ता.माढा) येथे ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामांची आणि उपक्रमांची माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या कमिटीच्या वतीने पाहणी व तपासणी दौऱ्यात मंगळवारी (ता.१८) आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन विनायक गुळवे यांनी केले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता अनिलकुमार अनभुले होत्या. यावेळी माळशिरसचे विस्ताराधिकारी विठ्ठल कोळेकर, कृषी अधिकारी नितीन चव्हाण, शाखा अभियंता सुरज दरवेशी, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माढ्याचे गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील म्हणाले की,माढा तालुक्यातील चार गावांपैकी निकष व नियमाप्रमाणे मूल्यांकन करून एका गावाची शिफारस जिल्हास्तरीय कमिटीकडे करण्यात येणार आहे. माळशिरस तालुक्यातील कमिटीने या चारही गावातील पाहणी व तपासणी वस्तुनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने केली आहे.ज्या गावाचे काम सर्वोत्तम आहे त्यास नक्कीच पुरस्काराची संधी मिळणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, प्रास्ताविकात आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने राबवलेल्या योजनांची व उपक्रमांची माहिती सांगितली. आजपर्यंत गावाला सर्वांच्या सहकार्यामुळे मिळालेल्या विविध पुरस्कारामुळे गावाचा तालुक्यात नावलौकिक उंचावला आहे. विशेष बाब म्हणजे गावातील वाचनालय,पतसंस्था व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कामकाज व दर्जा उत्कृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामसेविका अनिसा पठाण प्रमोद लोंढे, भारत रेपाळ, रेश्मा पाटील, मनीषा शेंडकर, महादेवी मस्तूद,पोलीस पाटील बालाजी शेगर, महावीर आखाडे, शिवाजी शेगर, रमेश बरकडे, कैलास सस्ते, रोहिदास शिंगाडे, जयराम भिसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी मानले.