छत्रपती संभाजीनगर : आमदार बबनराव लोणीकर आणि आमदार राजेश टोपे यांची कथीत ऑडीओ क्लिप समाज माध्यमामध्ये व्हायरल होत आहे. त्यामुळे जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून झालेल्या वादाची धग अजूनही असल्याचे पहायला मिळत आहे. या कथीत ऑडीओ क्लिपमध्ये आमदार बबनराव लोणीकर हे आमदार राजेश टोपे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र ही ऑडीओ क्लिप माझी नसल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हणत त्यांची बाजू मांडली आहे. तर, आमदार राजेश टोपे यांची बाजू अजून कळू शकलेली नाही.
अरे चोर कुत्रा, तुझं टक्कल फोडतो, अशी भाषा बबनराव लोणीकर यांनी राजेश टोपे यांनी वापरल्याचे ऑडिओ क्लिप मध्ये दिसत आहे. जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून झालेल्या वादामुळेच टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. तर, संध्याकाळी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या घरावर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. यात त्यांच्या घराच्या शेजारीच असलेल्या भावाच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले होते. दरम्यान, आता या दोन्ही आमदारांची एक तथाकथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेत जालना जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली उभा असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली होती. या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या होत्या, तसेच त्यांच्या गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बॉटल देखील सापडली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वादातून ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.