परभणी : परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परभणीमध्ये आंबडेकरी अनुयायांनी काही ठिकाणी दगडफेक, तर दुकाने देखील पेटविल्याचा प्रकार घडला आहे. संविधानाचा अपमान केल्याने आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन सुरु केले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
नेमकं प्रकरण काय?
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्गाजवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. पुतळ्याचे मागील काही महिन्यापूर्वी सुशोभीकरण केले होते. पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर भारतीय संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. ही संविधानाची प्रतिकृती एका व्यक्तीने जागेवरून काढून तिचा अवमान केला. ही घटना मंगळवारी (दि. १०) सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.
या प्रकारानंतर सदरील कृत्य करणाऱ्या व्यक्तीला परिसरातील नागरिक, युवक, जमावाने चांगलाच चोप दिला. त्यानंतर घटनास्थळी जमावाने रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला. यामुळे शहरात सायंकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनास्थळी नवा मोंढा आणि पोलिस यंत्रणेतील विविध पथके दाखल झाली. त्यानंतर संबंधित इसमास जमावाच्या ताब्यातून घेत पोलिसांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले.
त्यानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी जिंतूर रोडवरील विसावा फाटा येथे आंबेडकरी अनुयायांनी रास्तारोको देखील केला होता. आता हे आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी दुकाने, रस्त्यावर गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. तर काही ठिकाणी दगडफेक देखील करण्यात आली आहे. त्यामुळे संविधान अपमान प्रकरणाला हिंसक वळण लागले आहे.