-बापू मुळीक
पुणे : पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी ‘एअर बलून’ लावून आचारसंहितेचा भंग केल्याचे समोर आले आहे. शिवतारे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
युवक काँग्रेसचे अक्षय सागर, सागर घाडगे, ज्ञानेश्वर जाधव यावेळी उपस्थित होते. फुरसुंगी येथील ‘रॉयल स्टेईन लॉजिंग’ या लॉजवर शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी हवेत ‘एअर बलून’ बांधला आहे. या बलून वर पक्षचिन्ह आणि शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर आहे.
आचारसंहितेच्या काळात निवडणूक प्रचाराच्या उद्देशाने बॅनर अथवा होर्डिंग लावण्यास राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना प्रतिबंध आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.