लोणी काळभोर, (पुणे) : विलू पूनावाला फाऊंडेशनच्या वतीने लोणी काळभोर गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर रहाणा-या नागरिकांना मोफत व शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून आगामी काळात एक मोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आदर पूनावाला क्लिनसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्हार करवंदे यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय परिसरातील कोळपे वस्ती परिसरातील नागरिकांना मोफत पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचे संयंत्र बसवण्यात आले. या (वाॅटर एटीएम) संयंत्राचे लोकार्पण मंगळवारी (ता. १२) मल्हार करवंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, योगेश काळभोर, ज्योती काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भारती काळभोर, ललिता काळभोर, सविता लांडगे आदी ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
यापुढे बोलताना मल्हार करवंदे म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वच्छतेचे काम आदर पूनावाला क्लिनसिटीच्या वतीने करण्यात येत आहे. स्वच्छते संदर्भात अजून व्यापक स्वरूपात काम करण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीची क्षमता १००० लिटर आहे. स्थानिक नागरिकांना एक एटीएम कार्ड देण्यात आले आहे. हे कार्ड स्वाईप केल्यावर २० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मोफत मिळेल. एका घराला दररोज फक्त २० लिटर पाणी मिळेल. टाकीतील ९०० लिटर पाणी संपल्यावर आमच्या माणसाला एक मेसेज येईल. लगेच पाण्याचा टॅन्कर येऊन परत टाकी भरण्यात येईल. हि सर्व प्रक्रिया सोलर सिस्टीमने चालणार आहे.”
या कामाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच माधुरी काळभोर यांनी विलू पूनावाला फाऊंडेशनला धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार नागेश काळभोर यांनी मानले.