शिरुर: खेडी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीपेक्षा खेडी स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर केली पाहिजेत. गावाची अर्थव्यवस्था सक्षम करा, आरोग्यासह शिक्षणाच्या सोयी व अन्य सुविधा खेड्यात उपलब्ध झाल्यास खेड्यातून शहराकडे जाणारे लोंढे थांबू शकतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय गौरव पुरस्कार विजेते सरपंच संतोष ठीकेकर यांनी केले. स्वर्गीय बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने माजी आमदार बाबूराव दौंडकर यांच्या ३७ व्या स्मृतिदिन व कृषीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून ठिकेकर बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी होते. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रांत ग्रामविकास संयोजक मधुकर भोसले, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संभाजीअप्पा गवारी आदी उपस्थित होते.
यावेळी ठिकेकर म्हणाले की, प्रत्येक गाव हे वेगळे असते. त्यामुळे प्रत्येक गाव कसे सुधारले पाहिजे, ग्रामविकासाठी नेमके काय केले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. प्रत्येक गाव स्वत: वीजनिर्मिती, गॅसनिर्मिती व सीएनजी निर्मिती करुन ऊर्जावान होऊ शकतात. गावांच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार विकास योजना राबविल्या पाहिजेत. ग्रामविकासाकरीता ग्रामसभेचा सहभाग महत्वाचा आहे. आपल्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी आरो बसविल्यानंतर त्याचा चांगला परिणाम गावच्या आरोग्य सेवेवर होतो, असे देखील ठिकेकर त्यांनी सांगितले.