योगेश मारणे / न्हावरे : गावकऱ्यांनो गाड्या जरा जपूनच चालवा तसेच गाडी चालवताना स्वतःची आणि दुसऱ्याची काळजी घ्या, असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शिरूर-चौफुला व तळेगाव ढमढेरे-न्हावरे-काष्टी महामार्गालगत असलेल्या गावकऱ्यांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत म्हणजे अपघात होणार नाहीत व स्वतःचा जीव वाचेल, अशीच यामागची प्रत्यक्ष भावना आहे.
मात्र, संबंधित राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला (NHAI) सामान्य नागरिकांच्या जीवाचे काहीही घेणे-देणे राहिलेले नाही. रस्त्याच्या कामादरम्यान अनेकांचे बळी गेले त्याला जबाबदार रस्त्याचे काम करणारा कंत्राटदारच आहे. कारण, रस्त्यांची काही ठिकाणी अपूर्ण व निकृष्ट झालेली कामे, तर काही ठिकाणी चुकीची झालेली कामे याकडे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मुद्दाम दुर्लक्ष करत असून, मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदाराला संबंधित विभागाचे अधिकारीच पाठीशी घालण्याचे काम करत आहेत.
न्हावरे ते चौफूला महामार्ग रस्त्याचे काम होऊन जवळपास पूर्णत्वाकडे आहे. तसेच ५४८-डी हा महामार्ग पूर्ण होऊन दोन वर्ष झाली. या दोन्हीही महामार्गांवर अपवादात्मक कामे राहिली आहेत. रस्त्यांची रुंदी वाढून रस्ते सुसज्ज झाल्यामुळे या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांचे स्पीड आपोआप वाढले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्थानिक नागरिकांनाच जीव गमवावा लागला आहे.
यामुळे गावकऱ्यांनो तुमच्या जीवाचे कोणालाही काही घेणे-देणे नाही. तुमचा जीव तुमच्या घरच्यांसाठी लाख मोलाचा आहे. त्यामुळे रस्ता जरी आपल्या गावातून जात असला. तरीही वाहतुकीचे सर्व नियम पाळा. स्वतः ची व इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.असे आवाहन ‘पुणे प्राईम’ च्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणा अंतर्गत संबंधित महामार्गांचे काम अतिशय निकृष्ट झाले असून,अधिकाऱ्यांचे कंत्राटदारावर कोणतेही नियंत्रण नाही. संबंधित कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे अशी आम्ही मागणी केली आहे.
सुभाष कांडगे (प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजपा किसान मोर्चा)
संबंधित कंत्राटदाराने न्हावरे ते चौफूला रस्त्याचे काम वेळेत पूर्ण केलेले नाही. त्यामुळे त्या कंत्रादारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत करण्यात आलेला आहे. त्या कंत्राटदारावर कारवाई व्हावी यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ आग्रही आहेत.
सागरराजे निंबाळकर (मा. उपसरपंच)