पिंपरी चिंचवड, (पुणे): पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांनी विक्रीच्या प्रयत्नांत असलेले दोन कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स पकडले होते. याप्रकरणी हॉटेल कामगाराला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या फौजदार विकास शेळके याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे फौजदार शेळके याच्याकडून ४५ कोटी रुपये किमतीचे ४४.५० किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याने राज्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
१ मार्च रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांनी कारवाई केली होती. तेव्हा नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) याला अटक करून त्याच्याकडून २ कोटी रुपये किमतीचे २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करण्यात आले होते. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून निगडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव समोर आले.
उपनिरीक्षकाचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय असल्याने त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली होती. अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केलेल्या कसून चौकशी नंतर फौजदार शेळके याला मध्यरात्री अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४४.५० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले.