बारामती : बारामतीत विजय शिवतारे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. विधानसभा जागा ठरवल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही, नेत्यांनी सांगितलं तरी काम कोण करणार नाही, असं विजय शिवतारे यांनी एबीपी माझाचे प्रतिनिधी जयदीप भगत यांच्यासोबत बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बारामतीत विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीतअसल्याचं दिसत आहे.
पुढे बोलताना म्हणाले, विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय नाही, असं विजय शिवतारेंनी बोलताना सांगितलं आहे. विधानसभेच्या भूमिका आज-उद्या स्पष्ट होईल. जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत सबुरीची भूमिका घेतल्याचं शिवतारे यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल.
त्याकाळात पक्ष वेगळे होते, आम्ही राजकीय विरोधक होतो. आता परिस्थिती बदलली आहे. तुम्ही एकमेकांच्या आवडीचे विचार केले तर लोक मदत करतील आणि जर एकमेकांच्या इंटरेस्टचा विचार नाही केला, तर मला वाटत नाही अगदी नेत्यांनी जरी सांगितलं तरी लोक ऐकतील, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू अशीच सर्व ठिकाणी परिस्थिती असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
जुने सहकारी शरद पवारांची साथ देणार?
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जुन्या सहकाऱ्यांची साथ घेत आहेत, या चर्चांवर विजय शिवतारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासोबत शरद पवार किंवा अजित पवार कुणाचंही बोलणं झालेलं नाही, तसेच महायुतीत असल्याने अजित पवार यांच्याशी भेटीगाठी होतात, मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुणाशी भेटीगाठी किंवा चर्चा झाली नसल्याचं शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.