मुंबई : यापुढे महाराष्ट्र पोलिस खाकी वर्दीत किंवा गणवेशात नाचताना दिसले, तर त्यांची काही खैर नाही. असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत अनेक पोलिसांचे नाचतानाचे व्हिडीओ समोर आले होते. मुंबई, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये पोलिसांनी गणेश मिरवणुकीत सहभाग घेतल्याचे आढळून आले होते. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. पोलिसांनी मिरवणुकीत नाचणे कितपत योग्य? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अखेर या सगळ्या प्रकाराची पोलीस खात्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आता राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अधिकृत पत्रक जारी करत पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच खाकी वर्दीत नाचू नका, अशा सूचना मुंबई पोलिसांना अतिरिक्त पोलिस महासंचालकांनीही दिल्या होत्या. गणवेशात नाचताना आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. आता राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातूनच सर्व पोलिसांनी शिस्त पाळण्याच्या आणि कर्तव्यावर असताना गणवेशात नाचू नये, असे सांगण्यात आले आहे.