पुणे : ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर नाव दिसण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वासुली (ता. ता. खेड, जि. पुणे.) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. १०) रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्याच्या महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. सतिश संपतराव पवार (वय ५२, पद तलाठी (वर्ग-३), सजा-वासुली, ता. खेड, जिल्हा पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडीलोपार्जीत शेतजमीनीचा ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव दिसत नव्हते. त्यामुळे त्यांचे ऑनलाईन नाव दिसण्यासाठी वासुली तलाठी कार्यालय येथील तलाठी लोकसेवक सतिश पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा लोकसेवक सतिश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
दरम्यान, सदर तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक सतिश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे वडीलोपार्जीत शेतजमीनीचा ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव दिसण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वासुली तलाठी कार्यालयात सापळा रचला. तेव्हा आरोपी लोकसेवक सतिश पवार यांना तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तलाठी पवार यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत आहेत.