पुणे : आजपासून निवडणुकीला ५५ दिवस आहेत. त्यामुळे कमी दिवस वगैरे काही नाही. ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरेल, त्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येईल. तेव्हा आपण निवडणूक कशी एकतर्फी होईल हे पाहू. माझी वेळ नक्कीच चुकलेली नाही. मी वेळ घेतोय. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले कि, वसंत मोरे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले, तर त्याने आम्हाला फारसा फरक पडणार नाही, असे विधान भाजपा नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधत म्हणाले कि, तसा फरक पडला नसता तर २०२२ ला ते मला म्हणालेच नसते की, तुम्ही भाजपात या. मॅरिएट हॉटेलमध्ये मला पुरस्कार दिला होता.
तेव्हा उघडपणे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते की तुम्ही भाजपात या, तुम्ही निवडून याल. मी तेव्हाच त्यांना सांगितले की माझ्या तिन्ही टर्म भाजपाविरोधात झाल्या आहेत आणि तिन्ही वेळा मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर त्यांना दाखवतील, असं आव्हानच वसंत मोरे यांनी दिले आहे.
पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले कि, मी योग्य ट्रॅकवरच, यशस्वी होईन महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. इथे फक्त निवडणुका लढायच्या नाहीत, तर जिंकायच्याही आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी लढायचे असेल तर योग्य ट्रॅकवर असणे गरजेचे आहे. मी योग्य ट्रॅकवरच असून त्यात यशस्वी होईन असे मला वाटते. पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात आम्ही लोकांकडून मत जाणून घेत आहोत. लोक बऱ्याचदा काही पर्याय सुचवतात. पण ते निवडताना पुण्याचे हित झाले पाहिजे त्या दृष्टीने पावले टाकतो, असंही वसंत मोरे म्हणाले.