पुणे : तीन ते चार जणांच्या टोळक्याने ‘आम्ही येथील भाई आहोत’, असे म्हणत लोखंडी रॉडने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन चाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड करुन नुकसान केले. हातातील रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार नऱ्हे येथील सिंहगड कॉलेजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर बुधवारी (ता. २१) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत नाना बाबासो भुसे (वय-३२, रा. वैष्णवी भवन, नरवसकर वस्ती, सिंहगड कॉलेज जवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तीन ते चार जणांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची चारचाकी गाडी (एमएच १२ व्हीएफ ७८३४) रस्त्याच्या बाजुला पार्क केली होती. बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तीन ते चार जण दोन दुचाकीवरुन आले. त्यांनी जोर जोरात आरडा ओरडा करुन हाताली लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या गाडीची पाठीमागील काच फोडून नुकसान केले.
आरोपींनी फिर्यादी यांच्या गाडीजवळ पार्क केलेली वॅगन आर, स्विफ्ट, टेम्पो, दोन रिक्षांच्या काचा फोडून नुकसान केले. वाहनांची तोडफोड केल्यानंतर, एका एकाला जीवंत सोडणार नाही, असे म्हणून त्यांच्या हातातील लोखंडी रॉड हवेत फिरवत कोणी आमच्या नादाला लागू नका, आम्ही येथील भाई आहोत, असे म्हणून हातातील रॉड हवेत फिरवून दहशत पसरवून शिवीगाळ करत दुचाकीवरुन पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लाड करीत आहेत.