पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेले वाल्मिक कराड याला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. या वृत्तास सीआयडीच्या अधिका-याने दुजोरा दिला आहे.
वाल्मिक कराड यांच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बॅंक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याचेही बॅंक खाते गोठवण्यात आले आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना आधीच अटक केली आहे. तसेच या प्रकरणात वाल्मिक कराडचही नाव घेतलं जात.
देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे आरोपी फरार आहेत. तर विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. असे असले तरी पोलीसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.