दिल्ली : केंद्र सरकारकडून मंगळवारी रात्री उशिरा व्ही नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 14 जानेवारी रोजी इस्रोचे विद्यमान प्रमुख एस सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनेही यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
इस्रोच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे व्ही नारायणन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. व्ही नारायणन हे एक प्रसिद्ध इस्रो शास्त्रज्ञ आहेत. ते सध्या केरळमधील वालियामाला येथे लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारतीय अंतराळ प्रोग्राममध्ये सुमारे चार दशकांचा अनुभव असलेल्या नारायणन यांनी इस्रोमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
व्ही नारायणन यांची इस्रोच्या नव्या अध्यक्षपदी निवड..
व्ही नारायणन यांची इस्रोच्या नव्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. व्ही नारायणन यांची नियुक्ती १४ जानेवारीपासून २ वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. सोमनाथ यांनी १४ जानेवारी २०२२ रोजी ३ वर्षांच्या कार्यकाळासाठी अंतराळ विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. व्ही नारायणन यांना भारतीय अंतराळ संस्थेमध्ये जवळपास चार दशकांचा अनुभव असून भारतीय अंतराळ संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांना रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये नैपुण्य आहे. ते GSLV Mk Ill यानच्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचे संचालक राहिले आहेत.
कोण आहेत व्ही नारायणन?
व्ही नारायणन १९८४ मध्ये इस्रोमध्ये रुजू झाले आणि केंद्राचे संचालक होण्यापूर्वी त्यांनी विविध पदांवर काम पहिले केले. सुरुवातीला सुमारे साडेचार वर्षे त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथे ASLV आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानच्या (PSLV) ध्वनीक्षेपक रॉकेट आणि सॉलिड प्रोपल्शनच्या क्षेत्रात काम केले.
व्ही नारायण यांनी १९८९ मध्ये IIT-खरगपूर येथे प्रथम क्रमांकासह क्रायोजेनिक अभियांत्रिकीमध्ये एम.टेकचे शिक्षण पूर्ण केले आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर (LPSC) येथे क्रायोजेनिक प्रोपल्शन क्षेत्रात प्रवेश केला. लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर वालियामालाचे संचालक म्हणून त्यांनी GSLV Mk III साठी CE20 क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यासोबतच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी LPSC ने ISRO च्या विविध मोहिमांसाठी 183 लिक्विड प्रोपल्शन सिस्टम आणि कंट्रोल पॉवर प्लांट तयार केले आहेत.