मुंबई : मंत्रालयात येणाऱ्या नागरिक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांचा विनासायास, सुलभ प्रवेश आणि मंत्रालयाची सुरक्षा, यांचा मेळ घालण्यासाठी कृत्रिम बुद्धिमतेचा (एआय) वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.
फडणवीस यांनी मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात बुधवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.
मंत्रालयातील प्रवेशापासून व्यक्ती बाहेर पडेपर्यंत सर्व व्यवस्था कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यरत करण्याच्या सूचना फडणवीस यावेळी दिल्या.