हनुमंत चिकणे
उरुळी कांचन – उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पुर्व हवेलीमधील सोळाहुन अधिक गावांसाठी उभारण्यात आलेले उरुळी कांचन येथील शवविच्छेदन केंद्र मागील दिड वर्षापासुन धूळ खात पडून आहे. शिरुर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दिड वर्षापुर्वी उदघाटन होऊनही, केवळ शवविच्छेदन करण्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने अपघात, आत्महत्या अथवा इतर दुर्दैवी घटनांमधील मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांना पुण्यातील ससून रुग्णालयात घेऊन जावे लागत आहे.
पुर्व हवेलीमधील नागरीकांची मागील दोन वर्षापासुन गैरसोय होत असतानांही, उदघाटन करणाऱ्या आमदार अशोक पवार यांच्यासह पुर्व हवेलीमधील सर्वच पक्षाच्या नेत्यांची जनतेच्या प्रश्नाबाबत चिडीचुप धोरण स्वीकारले असून पुर्व हवेलीच्या प्रश्नाला वाचा कोण फोडणार असा प्रश्न पुर्व हवेलीमधील नागरीत एकमेकांना विचारु लागले आहेत. तर दुसरीकडे उरुळी कांचन येथील वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन करण्याचे टाळत असल्यानेच हे शविच्छेदनगृह चालु होत नसल्याचा आरोप पोलीस दलाबरोबरच सर्वसामान्य नागरिकही करू लागले आहेत.
शवविच्छेदन केंद्र सुरु कधी होणार तसेच यांचे चित्र केव्हा बदलणार असा प्रश्न उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांना पडला आहे. शवविच्छेदन केंद्राला बांधून दोन वर्ष पूर्ण होत आली असून मात्र त्याचा आणखी एकदाही वापर करण्यात आला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराबाबत उरुळी कांचनसह परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन करण्याचे टाळत असल्यानेच हे शवविच्छेदनगृह चालु होत नसेल तर, अशा अधिकाऱ्यांवर जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाकडुन कायदेशीर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
पुर्व हवेलीमधील सोळा गावातील नागरीकांच्या सोईसाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व स्थायी समितीने उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शवविच्छेदन केंद्राला दिड वर्षापूर्वी मंजुरी दिली होती. शवविच्छेदन केंद्रांचे काम पूर्ण होऊन शिरूर- हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दिड वर्षापुर्वी शवविच्छेदन केंद्राचे मोठ्या उत्साहात व डामडौलात उद्घाटनही करण्यात आले होते. मात्र उदघाटन झाल्यापासुन सदर इमारत कुलुप बंद आहे.
वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन करण्याचे टाळत असल्यानेच हे शविच्छेदनगृह चालु होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे आमदार अशोक पवार यांच्या जवळच्या एका कार्यकर्त्याला श्रेय मिळु नये यासाठी गावातील काही राजकारणी हे केंद्र चालु करण्यास खोडा घालत असल्याची चर्चाही उरुळी कांचन परीसरात आहे. कारण काहीही असले तरी, त्रास मात्र उरुळी कांचन, लोणी काळभोर परीसरातील लाखो नागरीकांना भोगावा लागत आहे.
हवेली तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात नसल्याने रस्ता अपघात, आकस्मिक मृत्यू, रेल्वे अपघात, तसेच संशयास्पद मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयातच जावे लागते. कायदेशीरदृष्ट्या तपासाच्या मुद्द्यावरून शवविच्छेदन हि बाब महत्वाची असते. मात्र, उरुळी कांचन हे पुणे सोलापूर महामार्गावरील सुमारे एक लाख व त्यापेक्षाजास्त लोकसंख्या असणारे उपनगर आहे.
महामार्गावरील मोठे शहर असल्याने वर्दळीच्या वाहतुकीत अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये पोलिसांसह नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात आहे. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केंद्र व्हावे, अशी मागणी वर्षानुवर्षे केली जात होती. ती पूर्ण झाली असली तरी अधिकाऱ्याविना हे केंद्र धूळखात पडले असल्याने उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता कदम म्हणाल्या, शवविच्छेदन केंद्र हे उरुळी कांचन ग्रामपंचायतीने बांधले असले तरी, त्याची हद्द उरुळी कांचन की पुर्व हवेली हे ठरवून दिली पाहिजे. सध्या कर्मचारी कमी असल्याने, आम्हाला शवविच्छेदन केंद्र सुरु करता आलेले नाही. हे सुरु केले तर आणखी वैद्यकिय अधिकारी व कामगार वर्ग वाढवावा लागेल. तसेच शवविच्छेदन करण्याबाबतचे ट्रेनिंग घ्यावी लागेल.
पुर्व हवेलीत नेतेमंडळी नावापुरतीच…
पुर्व हवेलीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, कॉग्रेससह दोन्ही गटांच्या शिवसेना व मनसेसह अनेक पक्षाचे दिग्गज नेते आहेत. मात्र नागरीकांच्या एकाही प्रश्नावर एकाही पक्षाचा नेता रस्त्यावर उतरत नसल्याचे चित्र पुर्व हवेलीत मागील कांही वर्षापासुन दिसुन येत आहे. बारा वर्षापासुन यशवंत कारखांना बंद असतांनाही नेत्यांची बोलती बंद, नवीण मुठा कालव्याला अस्तरीकरण चालु असल्याने पुर्व हवेली बहुतांश शेती धोक्यात असतांनाही पुर्व हवेलीतील नेते कोमात..
पुणे-सोलापुर महामार्गावर छोट्या-मोठ्या चुकांच्यामुळे शेकडो बळी जाऊनही, नेत्यांच्या तोंडाला कुलुप.. दिड वर्षापुर्वी शवविच्छेदन गृहाचे उद्घाटन झाल्यापासुन इमारत बंदच… यामुळे पुर्व हवेलीमधील दिग्गज नेते म्हणजे असुन अडचण व नसुन खोळंबा अशी अवस्था झाली आहे.