Uruli Kanchan उरुळी कांचन, (पुणे) : मागील तीन ते चार महिन्यांपासून दुधाचा प्रतिलिटर वाढलेला भाव असला तरी त्यापेक्षा कितीतरी जादा भाव हे पशुखाद्य व चाऱ्याचे झाल्याने दूध उत्पादकांची अवस्था “हरभरे खाल्ले हात कोरडे” अशी झाली आहे. त्यामुळे पूर्व हवेलीसह परिसरातील दूग्ध व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. शेतीला जोड धंदा म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो.
शेतीतून विविध पिकाच्या माध्यमातून येणारे उत्पन्न हे निसर्गावर अवलंबून आहे. मात्र रोजचा प्रापंचिक खर्च भागविण्यासाठी दूग्ध व्यवसायाला मोठे महत्त्व दिले जाते. ग्रामीण भागात एका एका शेतकऱ्याकडे किमान २ ते ३ जर्सी गाई आहेत, एका गाईची किंमत तिच्या टक्केवारीनुसार ९० हजार ते एक लाख रुपये एवढी आहे. दूध व्यवसायाच्या मुळे दुधाच्या पैशा बरोबरच शेणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतीला खत मिळते.
रब्बीत ज्वारीसोबत चाऱ्यासाठी कडबा महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा कडब्याचे चांगले उत्पादन निघाले आहे. मात्र, बाजारात ज्वारीपेक्षा कडब्याला अधिक दर आहेत. त्यामुळे ज्वारीपेक्षा यंदा कडबाच अधिक भाव खात असल्याचे दिसत आहे. सध्या ग्रामीण भागात कडब्याची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
यंदा परतीचा पाऊस सलग पंधरा दिवस पडला. त्यामुळे अनेक भागांत वेळेत ज्वारी पेरता आली नाही. त्याचा परिणाम पेरणी क्षेत्रावर झाला आणि क्षेत्र घटले. हवामान बदल, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे ज्वारीच्या प्रत्यक्ष उत्पादनाला फटका बसला आहे. कडबा शेकड्यालाही अडीच ते तीन हजारांच्या जवळपास दर आहे. त्यामुळे बाजारात ज्वारीपेक्षा कडबाच भाव खात असल्याचे दिसून येत आहे.
बाजारात कडब्याला मागणी अधिक असते. जनावरांसाठी वाळलेला सकस आहार म्हणून कडब्याकडे पाहिले जाते. त्यामुळे दूध व्यावसायिक, शेळीपालन करणारे शेतकरी कडब्याला प्राधान्य देतात. मात्र मागणीच्या तुलनेत नेहमीच कडब्याचा तुटवडा होत असल्याचे दिसून आले आहे. बहुतांश भागात शेतकरी जागेवरच कडब्याची विक्री करतात.
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील शेतकरी संभाजी कांचन म्हणाले, “दुभती जनावरे संभाळणे म्हणजे सध्या तारेवरची कसरत आहे. घरी दुध लागते म्हणून दोन गायी पाळल्या आहेत. एकुण हिशोब केला तर दूध दरवाढ, इतर खर्च याचा ताळमेळ बसत नाही. केवळ घरचे दुध खायला मिळेल या हेतून या गायी पाळल्या आहेत. वाढलेल्या खर्चाने दुग्धव्यवसाय परवडणारा नाही.