हनुमंत चिकणे : पुणे प्राईम न्यूज
उरुळी कांचन, (ता. हवेली) : पुणे-सोलापूर महामार्ग ते सासवड मार्गावरील शिंदवणे घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून मागील दोन वर्षापासून या रस्त्याची डागडूजीहि करण्यात आली नाही. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी काही नागरिकांना व वाहनचालकांना कायमचे अपंगत्व आले आहे. प्रशासन मात्र मुग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसून येत आहे. जीव गेल्यावरच उपाययोजना करणार आहे का असा प्रश्न गावकऱ्यांसह वाहनचालकांना पडला आहे.
उरुळी कांचन – जेजुरी राज्य मार्गावर शिंदवणे घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे व वाहून गेलेल्या साईडपट्टयामुळे आणखीच भर पडली आहे. अडीच किलोमीटर अंतराच्या घाट रस्त्यात घाट उतरताना सुरुवातीला माळाचे वळण या दोन्ही ठिकाणी मोठी अपघाती वळणे आहेत. याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधीं लक्ष देत नसल्याचे स्थानिक नागरिकांसह वाहनचालक चर्चा करीत आहेत. मात्र, अपघात झाल्यानंतर संबंधित यंत्रणा तात्पुरती डागडुजी करून कायमस्वरूपी उपाययोजनेकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
शिंदवणे हा घाट हवेली व पुरंदर, दौंड या तीन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा घाट आहे. उरुळी कांचन ते जेजुरी हा ३० किलोमीटर अंतराची अवस्था पाहून वापर झालेल्या निधीबाबत शंका निर्माण होत असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे व पसरलेल्या मोठ्या खडीमुळे घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. जेजुरीहून सोलापूर रस्त्यावर येणाऱ्यांसाठी जवळचा रस्ता म्हणून शिंदवणे घाटाकडे पाहिले जाते. मात्र, या घाटात अतिशय तीव्र उतार, अवघड वळणे आणि संरक्षक कठडय़ाचा अभाव यामुळे शिंदवणे घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. या घाटात छोटे-मोठे अपघात झाले आहेत. मात्र अपघात झाल्यानंतरही त्यात कोणताही बदल झालेला नाही.
पुणे शहरात वाहतूक कोंडी असल्यामुळे अनेक वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. मागील दोन महिन्याच्या कालवधीत वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. सासवडहून उरुळी कांचन या मार्गी निघालेल्या पीएमपीएल बसचा शिंदवणे घाटातच ब्रेक फेल झाला. ही बाब लक्षात येताच बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने या ठिकाणी होणारी मोठी दुर्घटना टळली होती.
बारामती या ठिकाणावरून उरुळी कांचन या ठिकाणी येत असलेले क्रेन दोनशे ते तीनशे फुट खाली कोसळले. आषाढी वारीला आळंदीकडे निघालेली ४० वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात झाला होता. यामध्ये ११ वारकरी जखमी झाले होते. तसेच शनिवारी (ता. ३०) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी कलरच्या बकेट घेऊन निघालेला टेम्पो पलटी झाला आहे. यात चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उरुळी कांचन येथील खाजगी रुगणालयात उपचार सुरु आहेत. याबाबत वेळोवेळी स्थानिक नेते आणि प्रशासनाकडे या ठिकाणी कठडे बांधण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभगाचे त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे.
अपघातानंतर प्रशासन जागे होणार का?
पुरंदर तालुक्यातील उत्तर बाजूच्या अनेक गावातून उरुळी कांचन व हडपसर येथे दररोज ये- जा करणाऱ्या नागरिक, विद्यार्थी व शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. घाटातील अवघड वळणे, तुटलेले कठडे, वाहून गेलेल्या साईडपट्या, घाट रस्त्यावरील तुटके दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत की काय, असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.
याबाबत झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील मयूर झेंडे, गोपीचंद झेंडे म्हणाले, “सासवडवरून रोज लोणी काळभोर या ठिकाणी नोकरीनिमित्त जात आहोत. मात्र या रस्त्यावर खड्डा कि खड्ड्यात रस्ता तेच समजत नाही. प्रशासनाने ज्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते त्या वेळी या रस्त्यावर खडी भरण्यात आली होती. मात्र ती मोठी खडी संपूर्णपणे बाहेर आली असून दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढून अपघात झाले आहेत. तसेच तीव्र उतारावर कोणत्याही प्रकारची दिशादर्शक फलक दिसून येत नाहीत. त्यामुळे या ठिकाणावरील वळणावर वारंवार अपघात घडत आहेत.”
याबाबत उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे म्हणाले, “तीव्र वळणावर वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून भिंतींचे काम सुरु आहे. मात्र सदर ठिकाणी होत असलेल्या वारंवार अपघाताच्या ठिकाणावरील वळणाचा टप्पा कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे.जड वाहने वळताना वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने हे अपघात होत आहेत. तसेच घाटात कोणत्याही ठिकाणी दिशादर्शक फलक दिसून येत नाही. त्यामुळे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत.”
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.