बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडसह राज्यभरात संतापाची लाट पसरली. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.मात्र आरोपी कृष्णा आंधळे याचा तपास अद्याप सुरूच आहे. अशातच आता देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात एका अज्ञात महिलेचा वावर असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या महिलेने आरोपी कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात काल रात्री एका अज्ञात महिलेने प्रवेश केला. रात्रभर घराबाहेर मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर तिने कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो. माझ्याकडे त्याच्याशी संबंधित अनेक पुरावे आहेत, असा दावाही सुरू केला. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं. पण पोलिसांसमोर मात्र तिने आपल नावही सांगण्यास नकार दिला.
मात्र सदरील महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.