नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. आज (दि. 12) सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ अमित शाह हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. शरद पवार यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अमित शाह आले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दिल्लीच्या थंडीत राजकारण तर तापणार नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार शरद पवार यांचा आज (दि.१२) 85 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांनी बऱ्याच महिन्यानंतर एकत्रितपणे चहा, नाश्ता घेतला. त्यामुळे दोघे पुन्हा एकत्र येणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भेटीला गेल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.