लोणी काळभोर : थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील गतिरोधक वाचविताना दुचाकीचा अपघात झाल्याची घटना आज गुरुवारी (ता.2) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडल्याने त्यांच्या अंगावर गाडी गेली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचावरील दोघेजण थेऊर गावाकडून थेऊर फट्याकडे चालले होते. दुचाकीवरून जात असताना, त्यांची गाडी थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपुरावर आली असता अचानक समोर गतिरोधक आला. गतिरोधकाला धडकून दुचाकी वरील दोघेही रस्त्यावर पडले. तेव्हा थेऊर फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्या दोघांनाही चिरडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस अंमलदार सागर कदम, ईश्वर भगत, प्रशांत सुतार व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोन्हीही जखमींना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अद्यापही समजलेली नाहीत.