सातारा : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये तापोळ्याच्या आपटी गावातील बोटीतून मासेमारी करण्यासाठी जाळे टाकत असताना किसन धोंडीबा कदम (वय ४३) हे तोल जाऊन पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. रेस्क्यू टीमने अनेक तासांची शोधमोहीम राबवल्यानंतरही त्यांचा शोध लागला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तापोळ्याच्या आपटीमधील किसन धोंडीबा कदम हे शिवसागर जलाशयात शुक्रवारी रात्री साधारण सात ते आठ वाजताच्या सुमारास बोटीतून मच्छीमारीसाठी निघाले. जाळे टाकत असताना त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. काहीच वेळात ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.
घटनेबाबत माहिती गावचे पोलिस पाटील शामराव गायकवाड यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आज सकाळपासून स्थानिक नागरिकांनी शोधकार्य सुरू केले होते. तापोळा खोऱ्यातील अनेक नागरिक शोधकार्यात सहभागी झाले होते. अनेकांनी बोटीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बेपत्ता कदम मिळून आले नाहीत.
सकाळी अकराच्या सुमारास महाबळेश्वर, सह्याद्री आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या टीमनेही कदम यांचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न केले, मात्र त्यांच्या शोधकार्यालाही यश आले नाही. सायंकाळी उशिरा हे शोधकार्य रेस्क्यू टीमकडून थांबवण्यात आले.