नाशिक : प्रवाशांनी भरलेली कसाराहून खोडाळ्याच्या दिशेने जात असताना, एका जिपचा भीषण अपघात झाला आहे. या जीपची वैतरणा पुलावरील लोखंडी कठड्याला धडक बसली. या धडकेमध्ये जीप वैतरणा धरणाच्या दरीत कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा धरणाच्या जलाशयातील दरीत जीप कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर १० जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. प्रवाशांनी भरलेली जिप कसारा मालगावातून खोडाळा येथे जात होती. याच मार्गावरून जात असताना, जीपची वैतरणा नदीवरील पुलावरील लोखंडी कठड्याला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की जीप थेट १०० ते १५० हून अधिक उंचीवरून खाली कोसळली.
जीपमध्ये एकूण १० प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. तसेच एक कुटुंब कामानिमित्ताने खोडाळा येथे आपल्या नातेवाईकांकडे जात होते. या दरम्यान, वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाजवळ जिप चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने जिप थेट वैतरणा धरणाच्या जलाशयात खोल दरीत कोसळली.
घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत जीपमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केले. यामध्ये जिपमधून १० प्रवाशांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं. ग्रामस्थांनी तातडीने जखमींना कसारा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र उपचारानंतर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.