छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर एक धक्कादायक घटना घडली आहे. शहराजवळील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनकरवाडी तलावात गुरुवारी सायंकाळी चार मुले बुडाल्याची घटना घडली आहे. चारही मुले १२ ते १५ वयोगटातील असून त्यांना रात्री अग्निशमन दलाच्या पथकाकडून बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले आहे.
बिश्वजीतकुमार सुखदेव उपाध्ये (१२), अफरोज जावेद शेख (वय १२), जावेद शेख (वय १४ ), अबरार जावेद शेख (१२) असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावं आहेत. घटनास्थळी झोन १ चे पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक आघाव व त्यांचे पथक व तहसीलदार सोनी हे दाखल झाले होते. चारही मुलांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले होते.
मिलाल्लेया अधिक माहितीनुसार, संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात असलेल्या रांजणगाव शेणपुंजी येथे असलेल्या तलावात काही मुलं पोहण्यासाठी गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुलं पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांसह स्थानिक पोलिसांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले आहे. मात्र या चारही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
त्यानंतर या मुलांचा मृतदेह शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 11 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चारही मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, सायंकाळ होऊन देखील ते घरी परतले नाहीत. म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, मुलांच शोध घेत काही नातेवाईक तलावाजवळ पोहचले.
यावेळी त्यांना तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आले. त्यामुळे मुले तलावात बुडाल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस आणि स्थानिक नागरिकांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या शोधकार्यानंतर मुलांचा मृतदेह मिळून आले.